कर्मचारी सेवेत असताना त्याचेविरुध्द सुरु केलेली कार्यवाही त्याच्या सेवानिवृत्ती नंतर देखिल चालू राहते अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम १९८२ च्या नियम २७ मध्ये आहे. मात्र सदर नियमातील तरतुदीनुसार ,कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यांनतर ,फक्त गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणूकीच्या कारणावरून त्याला देण्यात येणारे निवृत्ती वेतन संपूर्ण पणे अथवा अंशत: कायमचे अथवा काही काळाकरिता काढून घेता येते किंवा शासनास झालेल्या नुकसानीची रक्कम पूर्णपणे अथवा अंशत: निवृत्ती वेतनामधून वसूल करता येते. म्हणजेच कर्मचारी सेवेत असताना त्याचे विरूद्ध जबर शिक्षा देण्यासाठी सुरु केलेली म.ना.से. (शिस्त व अपील ) नियम ८ च्या तरतुदीनुसार सुरु केलेली कारवाई त्याच्या सेवानिवृत्ती नंतर चालू ठेवून जरूर त्या प्रकरणात त्याचे निवृत्ती वेतन रोखता येते किवा काढून घेता येते. अन्यथा नाही
कर्मचारी सेवेत असताना त्याचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम १० अन्वये किरकोळ शिक्षा देण्यासाठी सुरु केलेली शिस्तभंग विषयक कार्यवाही, संबंधित कर्मचा-याचा सेवानिवृत्ती पूर्वी पूर्ण करून योग्य ती शिक्षा देणे जरुर आहे. सदर कार्यवाही सेवानिवृत्तीपुर्वी पूर्ण न केल्यास शिस्तभंग विषयक कार्यवाही संपुष्टात आणणे गरजेचे असते कारण सेवानिवृत्ती नंतर किरकोळ शिक्षा देता येत नाही व त्याची गंभीर स्वरुपाची गैरवर्तणूक नसल्याने त्याचे निवृत्ती वेतन रोखता किंवा काढून घेता येत नाही.
थोडक्यात कर्मचारी सेवेत असताना त्याचे विरुध्द सुरु केलेली म.ना.से (शिस्त व अपील ) नियम १९७९ च्या नियम १० अंतर्गत किरकोळ शिक्षा देण्यासाठी सुरु केलेली कार्यवाही सेवानिवृत्ती पूर्वी पूर्ण होऊ शकली नाही तर ती संपुष्टात आणून . कर्मचा-याला देय असणारे निवृत्ती वेतनाचे सर्व फायदे (सेवा उपदान, गट विमा योजना , भविष्य निर्वाह निधी ) संपूर्णपणे देणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment